भक्त जेव्हा त्या भगवंताला ‘आवाहनं न जानामि’ या भूमिकेतून सप्रेम साद घालतो, त्याच्याशी प्रेमाने संवाद साधत कृतज्ञ राहतो, तेव्हा त्या भक्ताचा समग्र जीवनविकास करण्यासाठी, भक्ताच्या जीवनातील दुष्प्रारब्धाचा नाश करण्यासाठी, त्याला आपल्या कृपेच्या पंखाखाली घेण्यासाठी भगवंत त्या भक्ताच्या जीवनात कसा अवतरित होतो, हे आम्ही वाचतो, ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ या पुस्तकामध्ये.
‘आवाहनं न जानामि’ म्हणणार्या भक्ताच्या प्रेमळ सादेस भगवंताने दिलेला प्रतिसाद आहे, ‘तदात्मानं सृजाम्यहम्’. ‘तदात्मानं सृजाम्यहम्’ हा त्या स्वयंभगवानाचा आवाज आहे, हा त्या स्वयंभगवानाने आपल्या भक्ताशी साधलेला प्रेमसंवाद आहे, भक्ताच्या हाकेला दिलेला ‘ओ’ आहे, ही त्या स्वयंभगवानाने भक्ताचा केलेला स्वीकार आहे.
‘तदात्मानं सृजाम्यहम्’ हे पुस्तक आम्हाला सांगते की अनन्तकोटी ब्रह्माण्डांचा संचालक असणारा तो स्वयंभगवान सर्वव्यापक असूनही त्याच वेळेस सर्वहृदयस्थही आहे आणि तो भक्ताच्या इतका जवळ आहे, प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान आहे आणि म्हणूनच त्याला आवाहन कसे करावे हा भाव भक्ताच्या मनात दाटतो आणि त्यातूनच भक्ताचा आवाज उमटतो, ‘आवाहनं न जानामि’.
‘तदात्मानं सृजाम्यहम्’ या पुस्तकाच्या सुरुवातीस सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणतात -
‘किडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.’