आवाहनं न जानामि


मानवास त्याच्या जीवनात संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाशिवाय विकास होऊ शकत नाही. जीवनपथावर अनेक चढ उतार असतात, कधी सुखाची छाया असते, तर कधी दु:खाचं कडकडीत ऊन सोसावे लागते. जीवनप्रवासात मानवास अनेकदा जाणवते की माझ्या संकटात मला आधार देणारा, दु:खात माझे अश्रू पुसणारा, माझ्या परिश्रमांना दाद देण्यासाठी माझ्या पाठीवर फिरणारा आणि आशीर्वादाच्या रूपात सदैव माझ्या डोक्यावर असणारा एक कृपेचा हात सतत माझ्याबरोबर आहे.

हा ‘त्या’चा हात, हा त्याचा आधार, हा त्याचा हस्तक्षेप हे सर्व त्या भगवंताचे, त्या सद्गुरुतत्त्वाचे माझ्यावर असणारे लाभेवीण प्रेम आहे, त्याची अकारण करुणा आहे आणि त्याची अपरंपार क्षमा आहे.

मी जशी जमेल तशी भक्ती करतो, माझे आचार, विचार, आहार, विहार नेहमीच अचूक असतात असेही नाही, मी त्याचे सदैव स्मरण राखतो असेही नाही; पण तरीही तो मला विसरत नाही, त्याचे प्रेम, त्याची कृपा, त्याची सहाय्यता यांसह तो अखंड माझ्या पाठीशी असतो. पण त्या भगवंताशी कसे बोलावे, त्याला आवाहन कसे करावे, त्याचे पूजन कसे करावे, त्याला प्राप्त कसे करावे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या चरणी कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे भक्ताला ठाऊक नसते आणि इथेच भक्ताचा संवाद सुरू होतो, त्या भगवंताशी, त्या सद्गुरुतत्त्वाशी.


‘आवाहनं न जानामि’ या पुस्तकाच्या सुरुवातीस सद्गुरु श्री अनिरुद्ध लिहितात - ‘हा आवाज आहे एका भक्ताचा, नाम घेणार्‍या भक्ताचा, पूजा अर्चा करणार्‍या भक्ताचा, एकांती राहणार्‍या, तसेच लोकांती राहून साधना करणार्‍याचा. ही आहे आर्त एका बालकाची, आपल्या आईकडे झेपावणार्‍या. ही साद आहे प्रत्येकाची, अगदी आतून आलेली, खूप खोलवरून आलेली आणि ह्या अनंताकडे झेपावणारी.’ 

‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक वाचताना प्रत्येक भक्ताला जाणवते की ही तर माझीच सध्याची स्थिती आहे, ह्या माझ्याच भावना आहेत, हेच तर माझ्या मनातले विचार आहेत. प्रत्येक भक्ताला आपल्या मनातील भावना व्यक्त करून आपल्या भगवंताशी संवाद साधण्याची इच्छा असते आणि ‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक हीच भूमिका प्रस्तुत करते.

त्याचप्रमाणे सध्याच्या माझ्या स्थितीतून पुढे जात राहून त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची आणि त्यासाठी त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत त्याचे प्रेम त्याला देत प्रवास कसा करायचा हेदेखील ‘आवाहनं न जानामि’ स्पष्ट करते.

आणि म्हणूनच ‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक हा भक्ताचा भगवंताशी संवाद आहे, त्याचबरोबर भक्ताच्या त्याच्या ‘स्व’शी होणारा संवाद आहे. ‘आवाहनं न जानामि’ हे पुस्तक भक्ताला त्याच्या भक्तिमार्गावरील प्रवासासाठी आश्वासन देते, आधार देते, दिशा देते, गती देते आणि प्रवासासाठीची शिदोरीही देते.